यवतमाळ: मिटनापूर खून प्रकरण: केवळ १२ तासांत आरोपी गजाआड

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील मिटनापूर येथे घडलेल्या सनसनाटी खून प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक करत प्रभावी कारवाई केली आहे. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या सैयद नाजीम सैयद रऊफ (वय ४०) यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैयद नाजीम हे नेहमीप्रमाणे म्हैस चरण्यासाठी मिटनापूर शिवारातील बेबंळा धरणाच्या कॅनालजवळ गेले होते. सायंकाळी ते गंभीर जखमी अवस्थेत आढळले. यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईचे आदेश देत स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथक बाभूळगाव येथे रवाना केली.
पोलीस निरीक्षक लहूजी तावरे (बाभूळगाव) आणि पोलीस निरीक्षक सतिश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त तपास पथकाने आरोपी युनुस मुल्ला जाबीर मुल्ला (वय २७, रा. मिटनापूर) याला अटक केली. तपासात समोर आले की, दीड वर्षांपूर्वी मृतक आणि आरोपी यांच्यात म्हशीला काठी मारण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादात सैयद नाजीम यांनी युनुसच्या वडिलांना मारहाण केली होती. याच रागातून युनुसने खुनाची योजना आखली. खुनाच्या दिवशी सैयद नाजीम कॅनालजवळ दिसताच युनुसने धारदार लोखंडी विळा आणि काठीने त्यांच्या छाती, बगलेखाली आणि डोक्यावर वार करत खून केला.
पोलिसांनी आरोपीकडून रक्ताने माखलेले कपडे आणि हत्यार जप्त केले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत चौधरी करीत आहेत.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.