LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावतीत सकल हिंदू समाजाचे पश्चिम बंगाल हिंसा प्रकरण विरोधात तीव्र आंदोलन

अमरावती : पश्चिम बंगालमधील वक्फ (संशोधन) कायदा २०२५ च्या विरोधात मुर्शिदाबाद येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ अमरावती शहरातील राजकमल चौकात सकल हिंदू समाज, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो हिंदू बांधवांनी एकत्र येत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि विविध मागण्यांचे फलक झळकावले.

“पश्चिम बंगाल के हिंदूओं के सम्मान में, बजरंग दल मैदान में” अशा घोषणांचे फलक हाती घेऊन आंदोलकांनी हिंसाचाराचा तीव्र निषेध नोंदवला. मुर्शिदाबाद येथे वक्फ कायद्याच्या विरोधातील निषेधाला हिंसक वळण लागले होते, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेच्या विरोधात अमरावतीत संतप्त वातावरण पाहायला मिळाले.

आंदोलनातील प्रमुख मागण्या:
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

हिंसा प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मार्फत सखोल चौकशी करावी.

हिंसा घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

आंदोलनात सहभागी प्रमुख व्यक्ती:
या आंदोलनात राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ. सुरेश चिकटे, बंटी पारवाणी, वासुदेवानंद गिरी महाराज, बादल कुलकर्णी, अनिल साहू, निरंजन दुबे यांच्यासह शेकडो सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते. आंदोलकांनी पश्चिम बंगालमधील हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकजुटीने आवाज उठवला आणि केंद्र सरकारकडून तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली.


पश्चिम बंगालमधील परिस्थिती:
पश्चिम बंगालमधील हिंसाचारात बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याचा दावा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालातून समोर आला आहे. मुर्शिदाबाद आणि दक्षिण २४ परगना येथे झालेल्या हिंसेत मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, स्थानिक प्रशासन घुसखोरांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे.

अमरावतीतील या आंदोलनाने पश्चिम बंगालमधील हिंदू समाजाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आंदोलकांनी पश्चिम बंगाल सरकारच्या तुष्टिकरणाच्या धोरणांवर टीका करताना, हिंदू समाजाच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!