भोयर यांचं शक्ती प्रदर्शन उमेदवारीसाठी तर नाही ?

अमरावती : शनिवारी अमरावतीतील पंचवटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एक मोठा शिक्षक मेळावा पार पडला. हा मेळावा भाजपात नुकतेच प्रवेश केलेल्या चंद्रशेखर भोयर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भोयर यांचे अनेक समर्थक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे याच शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढलेल्या संगीता शिंदे यांची देखील उपस्थिती होती, ज्यामुळे या मंचावरील राजकीय समीकरणे अधिकच उत्सुकतेची ठरली. मेळाव्याचं सर्वात ठळक आकर्षण ठरलं ते माजी खासदार नवनीत राणा यांचे भाषण.
नवनीत राणा यांनी मेळघाटपासून ते शहरातील शिक्षकांच्या समस्या अत्यंत प्रभावीपणे मांडत, शिक्षकांच्या बाजूने आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांचे भाषण शिक्षकांच्या व्यथा आणि शासनाच्या उदासीनतेवर केंद्रित होते. दुसरीकडे चंद्रशेखर भोयर यांनी भाषणात पूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या अन्यायाचा मुद्दा उचलून धरला. शिक्षकांच्या काही समस्या त्यांनी नमूद केल्या, मात्र बहुतेक वेळा स्वतःच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेण्यातच भाषण केंद्रित होते. मेळघाटातून आलेल्या एका शिक्षकाने सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की, “शिक्षकांच्या समस्या अजूनही तशाच आहेत, समाधान नाही.” त्यामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली – “या मेळाव्याचं आयोजन फक्त आगामी शिक्षक मतदार संघासाठी महायुतीकडून उमेदवारी मिळावी म्हणूनच झालं का?” असा सवाल आता मोठ्या प्रमाणात विचारला जातोय.