Crime Pune: शिक्षणाच्या माहेरघरात मुली असुरक्षित; ४ मुलींसोबत व्हॅन चालकाकडून अश्लील कृत्य

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शाळेतील एका व्हॅन चालकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीने त्यांना घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्हॅन चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील एका नामांकित शाळेतील एका व्हॅन चालकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींसोत अश्लील कृत्य केले आहे. आरोपी चालकाने मुलींसोबत अश्लील कृत्य करून ही बाब घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी ही घटना लपवून ठेवली होती.
मात्र, ही बाब समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्हॅन चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेची माहिती पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला पोलीस स्टेशनबाहेर चांगलाच चोप दिला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनीही नांदेड पोलीस ठाण्यात हजेरी लावून आरोपीला चोप दिला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.