अकोल्यात प्लास्टिक विरोधी स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला: अकोला शहरात ‘स्वच्छ अकोला, सुंदर अकोला’ या सामूहिक मोहिमेअंतर्गत आज एक अत्यंत स्तुत्य उपक्रम पार पडला. शहरातील गांधी चौक, रामदासपेठ-टिळक पार्क परिसर आणि राऊतवाडी भागात सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याविरुद्ध युद्ध छेडलं.
“प्लास्टिक कॅरीबॅग नाही रे बाबा, नकोच!” असा संदेश देत हातात झाडू, फावडे आणि कचऱ्याचे पिशव्या घेऊन ही मंडळी थेट रस्त्यावर उतरली. घरोघरी स्वच्छता पाळली जाते, मात्र रस्त्यावर पडलेल्या किंवा कोपऱ्यांत साचलेल्या कचऱ्याची जबाबदारी कोणी घेत नाही — ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार या मोहिमेमागे आहे.
या मोहिमेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘कोणाचाही नसलेला’ कचरा उचलण्याची जबाबदारी आता सामाजिक स्तरावर घेण्याची सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करत, प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत माहिती देत आणि स्वच्छतेचा संदेश देत हे कार्यकर्ते पुढे सरसावले.
या उपक्रमाला स्थानिक प्रशासनाचाही पाठिंबा मिळाल्याने शहरात उत्साहाचं वातावरण होतं. काही भागांमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्टर-बॅनर घेऊन रॅली काढली. तर काहींनी प्लास्टिक कचऱ्याचं वर्गीकरण करून तो रिसायकलिंगसाठी पाठवण्याची जबाबदारी उचलली.