नागपुरात वाढले गुन्हेगारीचे प्रमाण, भरदिवसा युवकाची निर्घृण हत्या

नागपूर : कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माडा कॉलनी परिसरात आज भरदिवसा एक थरारक घटना घडली. अंकुश कडू या तरुणाचा अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने भोसकून निर्घृण खून केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अंकुश कडू आपल्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून माडा चौकात पोहोचला असताना एका तरुणाने त्याचा रास्ता अडवत वाद घातला. याचवेळी दबा धरून बसलेल्या इतर हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्राने अंकुशवर हल्ला चढवला. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या हल्ल्याने उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांनी अंकुशवर सलग वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी अंकुशला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कपिल नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार हा खून जुन्या वैमनस्यातून किंवा गँगवॉरमुळे घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नागपुरात सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. हत्या, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलीस प्रशासन आता कठोर पावले उचलेल का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. कपिल नगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच आरोपींना अटक होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.