लग्नात विघ्न, मंडप उभारताना विद्युत तारेचा स्पर्श – दोन तरुणांचा मृत्यू

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बोरगाव गावात आज लग्नाच्या आनंदावर दुःखाची काळी छाया पडली. मंडप उभारणीदरम्यान विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही हृदयद्रावक घटना आज (रविवार) दुपारी घडली. बोरगाव येथे दोन विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते. गावात लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. याच दरम्यान गावातील युवक मंडप उभारणीचं काम करत असताना, मंडपाच्या लोखंडी पाईपचा स्पर्श वरून जाणाऱ्या विद्युत तारेला झाला. यामुळे जोरदार विद्युत प्रवाह शरीरात उतरल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा युवक गंभीर जखमी झाला.
मृत्यू झालेल्या युवकांची नावे पांडुरंग बट्टेवाड आणि साईनाथ बट्टेवाड असून, ते दोघेही सख्खे चुलत भाऊ आहेत. जखमी युवकावर तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ज्याठिकाणी आनंदाचे वातावरण असावं, तिथे अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने गावकरी सुन्न झाले आहेत. लग्नाच्या दिवशीच अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे महावितरणच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. उघड्या विद्युत तारा, त्यांची उंची व मंडप उभारणीसाठी कोणतीही सूचना न दिल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.