अकोला : वल्लभ नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, लाखोंचं नुकसान

अकोला : वल्लभ नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, लाखोंचं नुकसान आज दुपारी १२:३० वाजता अकोला शहरालगत असलेल्या वल्लभ नगर परिसरात एका घरात अचानक भीषण आग लागली. ही आग नामदेवराव आगरकर यांच्या घरात लागली असून शॉर्टसर्किटमुळेच ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सुरुवातीला किरकोळ धूर दिसू लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केलं आणि संपूर्ण घर आगीच्या विळख्यात आलं. घरातील धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणं, लहान चक्की आणि गॅस सिलेंडर यांसह सर्व साहित्य जळून खाक झालं.
विशेष म्हणजे घरात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीचा वेग आणि तीव्रता अधिकच वाढली. स्फोटामुळे घराच्या भिंतीही फाटल्या असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
शेजाऱ्यांनी आवाज ऐकून तात्काळ धाव घेतली व अग्निशमन दलाला माहिती दिली. फायर ब्रिगेडने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरमालकाचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झालं आहे.
सध्या विजेच्या वायरिंगमुळे लागणाऱ्या आगींच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आणि विजेच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.