अकोल्याच्या मिनिमंत्रलयात आग महत्त्वाच्या फाईली जळाल्याची शक्यता
अकोला : शहरातील जिल्हा परिषद मुख्य इमारतीत आज दुपारी मोठी घटना घडली. सामान्य प्रशासन विभागाच्या कक्षात अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली, ज्यामुळे काही वेळासाठी एकच खळबळ उडाली.
दुपारी सुमारे १:३० वाजता इमारतीच्या एका भागातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे, अग्निशमन दल न बोलावता कर्मचाऱ्यांनीच प्रसंगावधान राखत आग विझवली, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.
प्रशासनाच्या तत्परतेमुळे आगीचा प्रसार रोखण्यात यश आलं आणि मोठा अनर्थ टळला. तरीदेखील या आगीत काही महत्त्वाच्या फाईली आणि दस्तऐवज जळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या घटनेनंतर इमारतीतील वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान, इमारतीमधील विद्युत सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.