अमरावतीचं बांबू उद्यान पर्यटकांविना ओसाड

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि शांतता लाभलेलं बांबू उद्यान, जे पर्यटकांसाठी कायम आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे, तिथं यंदा एप्रिल महिन्यात वेगळीच चित्र दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीच येथे कुटुंबं, युवक-युवती, आणि मुलांची गर्दी पाहायला मिळते. पण यंदा तापमानाने ४४ अंश सेल्सियसचा टप्पा गाठताच, हे उद्यान पर्यटकांविना शुकशुकाटाचं केंद्र बनलं आहे.
सध्या उद्यानात झुले, खेळणी, पाळणे सगळेच रिकामे पडले आहेत. सैरसुतासाठी येणारी चिमुकली पावलं थांबली, आणि आनंदाच्या किलबिलाटाऐवजी शांततेचं सावट पसरलं आहे.
काही थोडे युवक-युवती फोटोशूटसाठी जरी आले असले, तरीही संपूर्ण परिसर ओस आणि शांत आहे. यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळलं आहे – खाद्यपदार्थ विक्रेते, खेळण्यांचे दुकानदार, आणि इतर छोटे व्यवसायिक सध्या कमाईपासून वंचित राहिले आहेत.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून, बांबू उद्यानाच्या परिसरात आता फक्त उष्णतेचा सामना करत असलेली झाडं आणि रस्तेच उरले आहेत.