कारागृहातील महिलांना कापडी पिशवी शिवण्याचे प्रशिक्षण महिला व बालविकास विभागाचा उपक्रम
अमरावती : महिला व बाल विकास विभाग, महानगरपालिका अमरावती यांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथील महिला कैद्यांसाठी कापडी बॅग बनविण्याचे विशेष पंधरा दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.
दिनांक २ एप्रिल २०२५ ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये कैद्यांना साडी कव्हर, ब्लाउज कव्हर, मनी पर्स यासह एकूण १५ प्रकारच्या कापडी बॅग्स तयार करण्याचे कौशल्य शिकविण्यात आले.
प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महिला कैद्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त श्री. महेश देशमुख, उपायुक्त (२) श्री. नरेंद्र वानखडे, महिला व बाल विकास अधिकारी श्री. प्रकाश मेश्राम, कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे महानगरपालिका आयुक्त श्री. सचिन कलंत्रे यांचे मार्गदर्शन आणि सामाजिक दृष्टीकोनाची संकल्पना होती. या प्रशिक्षणामागील उद्दिष्ट म्हणजे महिला कैद्यांना शिक्षेनंतर बाहेर पडल्यावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ज्यामुळे त्या स्वाभिमानाने व सन्मानाने समाजात जगू शकतील.
यावेळी महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, “या प्रशिक्षणास महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून अशा उपयुक्त योजनांची अमलबजावणी पुढेही सुरूच राहील.”