अकोल्यात विद्युत तारा चोरी प्रकरण उघडकीस, सिटी कोतवाली पोलिसांची यशस्वी कारवाई!

अकोला: अकोला शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात विद्युत तारा चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध भागांतून विद्युत केबल चोरीच्या तक्रारी समोर येत होत्या. अखेर या प्रकरणात अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांच्या केबल चोरी प्रकरणाचा छडा लावत एका चोराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या स्टोअररूममधून विविध कंपन्यांच्या 47 बंडल केबल चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरीमुळे संबंधित कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करत सापळा रचला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, प्राथमिक चौकशीत आरोपीकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईमुळे अकोल्यात वाढणाऱ्या केबल चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.
सिटी कोतवाली पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्युत उपकरणे, तारा व केबल यांसंदर्भातील संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.