दहिगाव येथील आंबेडकरी मंडळींवरील खोटे गुन्हे रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
तेल्हारा : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या पंचशील आणि निळ्या झेंड्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वंचित बहुजन आघाडीने ही कृती गावातील काही जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या प्रकाराचा निषेध करत आंबेडकरी विचारसरणीच्या नागरिकांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, त्यानंतर तक्रारकर्त्यांवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात विनयभंगासारख्या गंभीर आरोपांचा समावेश असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. पोलिसांनी कोणतीही सखोल चौकशी न करता त्वरित गुन्हे दाखल केल्याने या प्रकरणातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय, तेल्हारा पोलिसांनी गावात कोंबिंग ऑपरेशन राबवत अनेक आंबेडकरी तरुणांना ताब्यात घेतल्याने गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने हा सर्व प्रकार राजकीय दबाव आणि जातीवादी मानसिकतेतून प्रेरित असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
स्थानिकांची मागणी:
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्यात आलेल्या आंबेडकरी नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.