अंजनगाव बारी परिसरात गळा चिरलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह

बडनेरा : बडनेरा परिसरातील रामगिरी बाबा मंदिराजवळ आज सकाळी 30 ते 35 वयोगटातील एका युवकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहावर गळा चिरल्याचे गंभीर जखमेचे निशाण आढळून आल्याने ही हत्या असल्याचा पोलिसांचा ठाम संशय आहे.
हत्या की वैयक्तिक वैर? विविध कोनातून तपास सुरू
प्राथमिक माहितीप्रमाणे, युवकाच्या गळ्यावर तीव्र धारदार शस्त्राचे वार झाले असून, चाकूने गळा चिरून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हत्या नेमकी कुठल्या कारणावरून झाली? ही वैयक्तिक दुश्मनी की इतर कोणता गुन्हेगारी हेतू? याचा पोलिसांकडून विविध कोनातून तपास सुरू आहे.
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त, ओळख पटवण्याचे प्रयत्न
सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखा व गुन्हे शाखा यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून मृत युवकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून, परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
गर्दीतही खून कसा झाला? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जिथे मृतदेह आढळला, तो अंजनगाव बारी रोडवरील गजबजलेला भाग असल्याने अशा ठिकाणी खून कसा झाला? याबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.