रस्त्याच्या दुरावस्थामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान बाबत मनसे आक्रमक..
अचलपूर : ग्राम असदपूर ते ग्राम येवता व्हाया अचलपूर मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दररोज शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गंभीर मुद्दा उचलत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन सादर करून तात्काळ रस्ता दुरुस्तीच्या मागणीसह १ मेपासून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
विद्यार्थ्यांना होतंय मोठं नुकसान:
ग्राम असदपूर ते ग्राम येवता व्हाया अचलपूर हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत असून तालुक्याला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर एस.टी. महामंडळाच्या दररोज ६ फेऱ्या धावत असून, ५०-६० विद्यार्थी तसेच महिलावर्ग, शेतकरी व जेष्ठ नागरिक या मार्गाचा नियमित वापर करतात.
मात्र गेली ३ वर्षे हा रस्ता पूर्णपणे खराब अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात एस.टी. सेवा बंद केली जाते आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. मागील वर्षी सुद्धा तब्बल ३ महिने एस.टी. सेवा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.
आंदोलनांचा इतिहास… पण प्रशासनाचे दुर्लक्ष:
या मागणीसाठी मनसेने याआधीही लोटांगण आंदोलन, उपोषण, तसेच पत्रव्यवहार करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. विद्यार्थ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून आवाज उठवला, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
१ मेपासून तीव्र आंदोलनाचा इशारा:
आगामी शैक्षणिक सत्र जून महिन्यात सुरू होत असल्यामुळे त्याआधीच रस्त्याची दुरुस्ती होणे अत्यावश्यक आहे. १० दिवसांच्या आत निधी उपलब्ध करून न दिल्यास महाराष्ट्र दिन १ मे पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
निवेदन सादर करताना उपस्थित असलेले मान्यवर:
पुरुषोत्तम काळे (तालुका अध्यक्ष), शीतिजा बारबुदे, मानसी आडवीकर, स्नेहल राठोड, ईश्वरी ढोके, सोनू मुंडाने, वेदांती जवंजाळ, दिलीप गुलेरकर, विजय साखरे, अमोल ढेंगेकर, सतीश भानगे, विशाल वऱ्हेकर, विक्की थेटे यांची उपस्थिती नोंदवण्यात आली.