रहमतनगरात कचऱ्याचे साम्राज्य; प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचा उद्रेक, सोमवारी मनपात आंदोलनाची चेतावनी!

अमरावती : प्रभाग क्रमांक १६ मधील रहमतनगर, जावेद नगर, रौशन नगर, कबीर नगर, अलिमनगर, मुज़फ्फरपुरा, गौसनगर, ताजनगर, गुलशन नगर, सादिया नगर, कलीम कॉलनी, हैदरपुरा, गड्ढे परिसर, मदरासी बाबा नगर, मुस्तुफा नगर या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून सफाई कामगार नसल्याने प्रचंड प्रमाणात कचरा साचला आहे. रस्त्यांवर साचलेला कचरा पावसाचे पाणी घेऊन थेट नागरिकांच्या घरात घुसत आहे.
स्थानिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही मनपा अधिकारी आणि ठेकेदार गप्प आहेत. फोनवर तक्रार करूनही कुठलाही उपाययोजना होत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. केवळ दोन कर्मचारी येऊन उगाचच सफाई करून कचरा तसाच रस्त्यावर टाकून निघून जातात.
या दुर्लक्षित परिस्थितीमुळे अखेर “ऑल इंडिया क़ौमी तंज़ीम” या संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्विकारण्याचे ठरवले आहे.
सोमवारी मनपा वैद्यकीय अधिकारी व आयुक्त यांच्या कक्षातच कचरा टाकून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी शिक्षण सभापती व पत्रकार अब्दुल रफिक रफ्फु यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, “सततच्या निवेदनानंतरही जर प्रशासनाने हलगर्जीपणा केला, तर नागरिकांना आवाज उठवावाच लागेल. आम्ही आंदोलन करतच राहू जोपर्यंत संपूर्ण प्रभागात नियमित सफाई कामगार नेमले जात नाहीत.”