पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अकोला : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे बायसरन खोऱ्यात हिंदू भाविकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभर तीव्र निषेध होत आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अकोल्यात आज विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.
या हल्ल्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, गुजरात आणि तमिळनाडू राज्यांतील २७ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून २० हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी हिंदूंना लक्ष्य करत आधी त्यांचे नाव विचारले, त्यानंतर “कलमा” म्हणायला लावून थेट गोळीबार केला, ही माहिती समोर आली आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या घटनांचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर आणि निर्णायक पावले उचलावीत. पाकिस्तानमधील दहशतवादी गटांवर थेट हल्ला करूनच अशा भ्याड हल्ल्यांना आळा घालता येईल.”
यावेळी विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्याची आठवण करून दिली आणि देशावर वारंवार होणाऱ्या अशा दहशतवादी हल्ल्यांवर कायमचा लगाम बसावा, यासाठी सर्जिकल स्ट्राईकसारखी जोरदार कारवाईची मागणी केली.
प्रदर्शनादरम्यान, पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत मूकमोर्चा काढण्यात आला. यामध्ये शहरातील विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.