AkolaLatest News
वयोवृद्ध महिलेस लुटणाऱ्या आरोपी अटक, अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई

अकोट – धारूळ येथील वयोवृद्ध महिलेची लूट करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला अकोट ग्रामीण पोलिसांनी केवळ दोन तासांत अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकलाबाई किसन डाखोरे या धारूळ येथील रहिवासी महिला खासबाग शिवारातील संत्र्याच्या बागेत काम करत असताना आरोपीने त्यांना एकटे पाहून त्यांच्या अंगावरील सुमारे ३३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटले.
घटनेनंतर अकोट ग्रामीण पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आणि अवघ्या काही तासांत सुमित सुनील डवंगे या आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडून लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला असून, पुढील तपास सुरु आहे.