AmravatiLatest NewsLocal News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2025 जाहीर

अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2025 विद्यापीठस्तर व महाविद्यालयीन स्तरावरील प्राचार्य, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर झाला आहे. दि. 1 मे, 2025 रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लगेचच विद्यापीठातील दृकश्राव्य सभागृहात आयोजित पुरस्कार प्रदान समारंभामध्ये कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. शाल व श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र आणि 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे पदक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
विद्यापीठ स्तर
सन 2025 च्या विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कारासाठी प्रथम श्रेणी अधिकारी सर्वसाधारण संवर्गात जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास रामदासपंत नांदुरकर, द्वितीय श्रेणी अधिकारी सर्वसाधारण वर्गवारीत अधीक्षक (सामान्य प्रशासन) श्री उमेश प्रभाकर लांडगे व महिला वर्गवारीत अधीक्षक (विकास) सौ. उमा प्रकाश चांभारे, तृतीय श्रेणी कर्मचारी सर्वसाधारण वर्गवारीत वरिष्ठ लघुलेखक (परीक्षा) श्री प्रविण रंगरावजी अलटकर व महिला वर्गवारीत वरीष्ठ सहाय्यक (वित्त) सौ. प्रज्ञा किशोर बोंडे, तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी सर्वसाधारण वर्गवारीत प्रयोगशाळा परिचर (रासायनिक तंत्रशास्त्र) श्री गजानन निळकंठराव देशमुख यांना पुरस्कार घोषित झाला आहे.
महाविद्यालयीन स्तर
सन 2025 च्या संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य/संचालक स्तरावरील उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कारासाठी सर्वसाधारण संवर्गात श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय, यवतमाळचे प्राचार्य डॉॅ. जयंत मधुकर चतुर व महिला संवर्गात विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीच्या प्राचार्य डॉ. प्रज्ञा एस. येनकर, शिक्षक सर्वसाधारण वर्गवारीत श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. दिपक केवळरामजी कोचे व महिला वर्गवारीत श्री आर.एल.टी., महाविद्यालय, अकोला येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. पुनम टिकमचंद अग्रवाल तसेच सर्व स्तरावरील शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वसाधारण वर्गवारीतून बॅ. रामराव देशमुख कला, श्रीमती इंदिराजी कापडीया वाणिज्य व न्या. कृष्णराव देशमुख विज्ञान महाविद्यालय, बडनेरा येथील वरिष्ठ लिपीक श्री जयंत वसंतराव निखारे यांना पुरस्कार घोषित झाला आहे.
उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कारप्राप्त सर्व प्राचार्य, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.