४.३१ कोटींची फसवणूक; नागपूरमधील दोन लोखंड व्यापाऱ्यांविरुद्ध कळमणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर – बाजारभावापेक्षा कमी दराने टीएमटी लोखंड देण्याचे आमिष दाखवून तब्बल ₹४.३१ कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या कळमणा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळमणा पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत प्रमुख आरोपीस अटक केली आहे.
फिर्यादी सैय्यद फरहान सय्यद फिरोज (वय ३०), रा. प्लॉट नं. ३, भोसा रोड, डेहनकर लेआउट, यवतमाळ, सध्या नेहरू नगर, कळमणा येथे भाड्याने राहत असून ते टीएमटी लोखंडाचे व्यापारी आहेत. २० मे २०२४ ते २१ डिसेंबर २०२४ दरम्यान त्यांची ओळख आरोपी १) मुर्तुजा युसूफ शाकीर (वय ४२) व २) शिरीन युसूफ शाकीर (वय ६९), दोघेही रा. फातीमा मंजिल, मोमिनपूरा, नागपूर यांच्याशी झाली.
आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीस काही व्यवहार योग्य पद्धतीने पूर्ण करत बाजारभावापेक्षा ₹१०-₹१५ ने कमी दराने लोखंड पुरवले. परंतु त्यानंतर, फिर्यादीकडून रोख व RTGS द्वारे एकूण ₹४,३१,६६,७६६/- घेतले, मात्र लोखंडाचा माल न देता बनावट इन्व्हॉईस व लेजर केवळ व्हॉट्सअॅपवर पाठवले. परिणामी, फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाली.
या तक्रारीवरून कळमणा पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. माने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ६०(बी), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुर्तुजा शाकीर यास अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.