अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा; महापालिकेची धडक मोहीम

अमरावती – शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमणे करतात. या अतिक्रमणांमुळेच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आताही महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या अतिक्रमणांना रडारवर घेतलं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. पाहता पाहता अतिक्रमणे जमीनदोस्त होऊ लागली आहेत. काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज दिनांक २४ एप्रिल,२०२५ रोजी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या उपस्थितीत जेसीपी व पाच ट्रक द्वारे रुक्मिणी नगर परिसर, सायंस्कोर परिसर, शिवटेकडी परिसर, बस स्टॅन्ड परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील. ज्यांनी अतिक्रमण केलं असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका प्रशासन काढून घेईल. तसेच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल असा इशारा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी दिल्या. या इशाऱ्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजारातील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई करणार असून त्याबाबत शहरातील इतर भागातील अतिक्रमणे मोकळे करून मुख्य शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करणार असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सांगितले.
नागरिकांना या अतिक्रमणांचा त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टींचा विचार करुनच महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करून अतिक्रमणे काढून घेत आहे.
सदर कारवाईत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.