जम्मू-काश्मीरमधील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना अमरावती मनपातर्फे श्रद्धांजली
अमरावती : जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या घटनेतील दिवंगत नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन व महानगरपालिका कर्मचारी/कामगार संघ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 5.30 वाजता मनपा मुख्यालयाच्या प्रांगणात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
या श्रद्धांजली कार्यक्रमास मा. आयुक्त श्री. सचिनजी कलंत्रे साहेब, संघटनेचे सरचिटणीस श्री. प्रल्हादजी कोतवाल, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. महेशजी देशमुख, मा. मुख्य लेखापरीक्षक श्री. श्यामसुंदरजी देव, मा. मुख्य लेखाधिकारी श्री. दत्तात्रयजी फिस्के, मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. विशालजी काळे तसेच महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व पर्यटकांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नागरिकांना पुष्प अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाद्वारे दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त करत, राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेचा संदेश देण्यात आला. अशा घटनांमध्ये बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व पाठिंबा व्यक्त करण्यात आला.