जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते जलरथाला हिरवी झेंडी
अमरावती : मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघाच्या वतीने जलरथाला आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी कमलताई गवई, अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनिल जाधव, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, सोनाली कोकाटे, गोविंद कासट आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना फायद्याची ठरणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
जलरथ हा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. योजनेच्या माहितीसोबतच नागरिकांचे गाळ घेण्याबाबतचे अर्जही यामार्फत भरून घेतले जाणार आहे. तसेच जलरथावर क्यूआर कोड देण्यात आला असून नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना धरणातील सुपिक गाळ शेतामध्ये टाकण्यासाठी मोफत उपलब्ध होणार आहे. केवळ इंधनाचा खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना यशस्वी झाली असून जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत आहे. जलरथाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत 117 धरणातून गाळ काढण्यात येत आहे. यामुळे जलसाठा वाढण्यासोबतच शेतजमीन सुपिक होण्यास मदत होणार आहे. तसेच भुजल पातळी वाढून विहिरीमध्ये पाणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.