परतवाडा विद्युत बिल वितरणातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश ग्राहकांना पेनॉल्टी आकारली जात आहे

परतवाडा : परतवाडा व अचलपूर परिसरातील विद्युत बिल वितरणात ठेकेदार व कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिटी न्यूजच्या तपासणीतून छोटा बाजार परिसरात उघड झालेल्या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
छोटा बाजार येथील वानखडे नावाच्या कर्मचाऱ्याने स्पष्ट सांगितले की, बिल चार दिवस उशिराने कंत्राटदाराकडून वितरित केले जाते. परिणामी ग्राहकांना बिलाची शेवटची तारीख संपल्यानंतर पेनॉल्टीचा भुर्दंड सहन करावा लागतो. अशावेळी कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची वागणूक मिळते, हेही निदर्शनास आले आहे.
परतवाडा व अचलपूर येथे 32,000 पेक्षा अधिक ग्राहकांना दर महिन्याला दहा रुपयांची पेनॉल्टी आकारली जाते. यामध्ये 15,000 हून अधिक ग्राहक ऑफलाइन पद्धतीने बिल भरणारे आहेत – जे बँक, पोस्ट ऑफिस किंवा महावितरण कार्यालयात जाऊन पैसे भरतात. यांना देखील उशिराचे खापर फोडून दंड लावला जात आहे.
या प्रकाराबाबत अचलपूरचे उपकार्यकारी अभियंता कुटे यांनी त्वरित लक्ष घातले असून, तपासणीचे आदेश दिले आहेत. वितरण प्रक्रियेमध्ये होत असलेल्या उशीरावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.