पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करावीत , जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती : जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवत आहे. गावांचे पारंपारिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी पुर्णत्वास आलेल्या योजना तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्ह्यातील उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणासंदर्भात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, नगरपालिकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, पाणीटंचाई आणि पाणी पुरवठ्यातील अनियमितता याबाबत तक्रारी आणि निवेदने वाढत आहे. पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र हा तात्पुरता पर्याय आहे. याबाबत ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी कामे सुरू केली आहे, ती तातडीने एक महिन्याच्या आत पूर्ण करावीत, कामे पूर्ण करून नागरिकांना त्यांच्या घरी पाणी पुरवठा कशा प्रकारे करता येईल, याचे नियोजन करावे. जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे करण्यात येत आहे. याबाबत आवश्यक असणारी कार्यवाही करून कामे पूर्णत्वास न्यावीत.
उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची टँकरवरील निर्भरता कमी करावी. गावातील पाणी पुरवठा करणारी यंत्रणा सक्षम ठेवावी. गळती, पाईपलाईनची फुटणे यावर तातडीने कारवाई करून त्याच दिवशी पाणीपुरवठा सुरळीत करावा. पाणी पुरवठा करण्यासाठी योग्य दाबाचा विजपुरवठा होईल, याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाणी पातळी खाली गेलेली आहे. त्यामुळे याठिकाणी जलपुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात घ्यावी. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.