भातकुली तालुक्यातील बुधागड येथे पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची दीड किलोमीटर पायपीट

भातकुली – भातकुली तालुक्यातील बुधागड गावात कृत्रिम पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाही गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.
शहानूर प्रकल्पाच्या पाण्यात बोरवेलचे मिसळ?
शहानूर प्रकल्पाचे पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गावाला देत आहे. मात्र, या पाण्यात बोरवेलचे खारे पाणी मिसळले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गोड पाण्याचे बिल वसूल करून खारं पाणी देत असल्याचा आरोप केला जात असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पाण्यासाठी धामोरीमार्गे विश्रोळी प्रकल्पाचा आधार
शासन पुरवठा करत असलेल्या पाण्याचा दर्जा आणि वेळेवर मिळत नसल्याने बुधागडमधील नागरिकांना धामोरी ते भातकुली मार्गावरील विश्रोळी प्रकल्पाच्या एअर वॉलवरून पाणी आणावे लागते. यामुळे महिलांना आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांची मागणी
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्वच्छ व गोड्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्याची जोरदार मागणी केली असून कृत्रिम टंचाईमागे असलेल्या दोषींवर कारवाई करण्याचीही अपेक्षा व्यक्त केली आहे.