विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यास कृत्रिम बुद्धिमत्ता प्रमुख घटक- कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा
वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
अमरावती : आपल्याला नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जावे लागेल. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक प्रमुख शक्ती ठरेल. आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जाणीवपूर्वक, सावधगिरीने आणि विवेकाने केला पाहिजे असे प्रतिपादन वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, विश्वविद्यालयाचे जनसंचार विभाग व जनसंपर्क कार्यालय आणि पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ एप्रिल रोजी आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू प्रो. शर्मा उपस्थितांना संबोधित करीत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे पीआरएसआय पश्चिमचे उपाध्यक्ष एस.पी. सिंह, अमरावती विभागाचे माहिती उपसंचालक अनिल आलूरकर, मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. फरहद मलिक, जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबे, विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो. आनन्द पाटील मंचावर उपस्थित होते.
दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन विश्वविद्यालयाच्या गालिब सभागृहात मंगळवारी झाले. या प्रसंगी एस. पी. सिंह म्हणाले की बदलत्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जनसंपर्क क्षेत्रात व दैनंदिन कामात केला पाहिजे. त्यांनी कविता आणि शेर शायरीच्या माध्यमातून प्रेक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व समजावून सांगितले. अमरावती विभागाचे माहिती उपसंचालक अनिल आलूरकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे धोके आणि त्याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज स्पष्ट करताना सांगितले की या तंत्रज्ञानाचा वापर देश आणि समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. स्वागतपर भाषणात मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. फरहद मलिक म्हणाले की आपण भारतीय ज्ञान परंपरेला कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडून देश आणि जगात तिचा प्रसार केला पाहिजे.
विषय प्रवर्तन करतांना जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबे यांनी सांगितले की चॅट जीपीटी द्वारे समस्या कशा सोडवता येतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनावर परिणाम करत आहे आणि मोठे बदल घडवून आणत आहे. विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे यांनी पीआरएसआयचा परिचय देतांना सांगितले की, पीआरएसआयचे देशभरात एकूण २५ चॅप्टर कार्यरत आहेत, ज्यामध्ये जनसंपर्क अधिकारी, मीडिया शिक्षक व मीडियाचे विद्यार्थी जोडले गेले आहेत. दरवर्षी २१ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय जनसंपर्क दिवस म्हणून एका नवीन विषयावर साजरा केला जातो. यावेळी पाहुण्यांचे स्वागत सुतमाळ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन व कुलगीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन जनसंचार विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. राजेश लेहकपुरे यांनी केले तर वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी आभार मानले. यावेळी विदर्भातील जिल्हा माहिती अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, माहिती अधिकारी, विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक, शोधार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सत्रानंतर महादेवी वर्मा सभागृहात ‘शिक्षणाच्या विकासात एआयची उपयोगिता ‘ या विषयावर शिक्षण विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. गोपाल कृष्ण ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक सत्र पार पडले. यावेळी विश्वविद्यालयाचे लीला प्रभारी डॉ. अंजनी कुमार राय, आयआयआयटी, नागपूरचे सहायक प्रोफेसर डॉ. शिशुपाल कुमार, सॉफ्टवेअर असोसिएट डॉ. हेमलता गोडबोले यांनी आपले विचार व्यक्त केले. सत्राचे संचालन पीआरएसआय वर्धा चॅप्टरचे उपाध्यक्ष प्रफुल्ल दाते यांनी केले तर डॉ. अनवर अहमद सिद्दीकी यांनी आभार मानले.
‘मीडिया व जनसंपर्क मध्ये ए.आय. ची उपयुक्तता’ या विषयावरील सत्राचे अध्यक्षस्थान एस पी सिंह यांनी भूषविले. सत्रात विदर्भातून आलेले माहिती अधिकारी यांनी सहभाग घेतला व एआयची जनसंपर्कात भूमिका यावर विचार मांडले.