अकोल्यात अवैध सावकारीवर धडक कारवाई; कोरे धनादेश, स्टॅम्प पेपरसह आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त

अकोला : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यात अवैध सावकारी प्रकरणांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
दिपक गव्हारे, नितिन अबुज आणि संतोष आंबिलकर या तिघांच्या ठिकाणी एकाच दिवशी स्वतंत्र पथकांनी धाड टाकून कारवाई केली. या धाडीत कोरे धनादेश, नोंदवह्या, भाडेकरारनामे, बँक पासबुक, तसेच कोरे स्टॅम्पपेपर यासह विविध आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कार्यवाही पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली. जिल्ह्यात अवैध सावकारांकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारींवरून ही धडक कारवाई हाती घेण्यात आली होती.
नागरिकांनी अवैध सावकारांकडून पैसे घेणे टाळावे आणि गरज असल्यास केवळ नोंदणीकृत पतसंस्था, बँका किंवा परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. तसेच अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात तात्काळ तक्रार दाखल करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आजवरच्या कारवाईचा आढावा घेतला असता:
152.53 एकर शेती आणि 4939.50 चौ.फुट क्षेत्रफळ असलेली जागा नागरिकांना परत मिळवून देण्यात आली आहे.
एक राहते फ्लॅटही मूळ मालकाला परत करण्यात आला आहे.
एकूण 201 प्रकरणांत कारवाई झालेली असून त्यापैकी 58 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांच्या हक्काच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून अशी धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.