अमित शाहांचे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश; महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी नागरिकांची नोंद

दिल्ली/मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
शाह यांनी स्पष्ट आदेश दिले की, देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि त्यांची तातडीने परत पाठवण्याची खात्री करा. केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीनंतर एकही पाकिस्तानी नागरिक भारतात थांबू नये, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यभरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे. यातील फक्त 51 जणांकडे वैध कागदपत्रे आहेत, तर 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचेही धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील स्थिती:
नागपूर शहरात सर्वाधिक 2,458 पाकिस्तानी नागरिक असल्याचे नोंद.
- ठाणे शहरात 1,106 नागरिक,
- पिंपरी-चिंचवडमध्ये 290 नागरिक,
- नवी मुंबईत 239 नागरिक आढळले आहेत.
- अमरावती शहरातही 117 पाकिस्तानी नागरिक नोंदवले गेले आहेत.
या आकडेवारीनुसार, नागपूर, ठाणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत.
प्रशासनाची जबाबदारी वाढली
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणेवर मोठी जबाबदारी आली आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेणे, अवैध रहिवास रोखणे आणि तात्काळ कारवाई करणे हे आता प्रशासनासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
दरम्यान, देशातल्या नागरिकांत या आकडेवारीमुळे अस्वस्थता वाढली असून, पाकिस्तानप्रती रोषाचा सूर अधिक तीव्र झाला आहे. आता राज्य सरकार या प्रकरणात किती तत्परतेने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.