गरोदर महिलेचा मृत्यू , डॉक्टर वर हलगर्जीपणाचा ठपका , दर्यापुरातील घटना

दर्यापूर,: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकरणाची जखम ताजी असतानाच दर्यापूरातील नवजीवन हॉस्पिटलनेही निष्काळजीपणाची आणखी एक धक्कादायक घटना घडवली आहे. गर्भवती वर्षा दीपक कुठेमाटे हिचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
२२ एप्रिल रोजी नवजीवन हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या वर्षाची प्रसूती वेळेवर झाली नाही. एक रात्र आणि एक दिवस तिला तसंच ठेवलं गेलं. डॉक्टर रविंद्र साबळे आणि माधुरी साबळे यांनी योग्य उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप पती दीपक कुठेमाटे आणि वडील भाऊराव घुगरे यांनी केला आहे.
रुग्णाची स्थिती गंभीर होत असतानाही तातडीने निर्णय न घेता वेळ वाया घालवण्यात आला. अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर कुटुंबीयांना अकोला किंवा अमरावतीला नेण्याचा सल्ला देण्यात आला. अकोल्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितले, “जर एक तास आधी आणलं असतं, तर आई आणि बाळ दोघंही वाचले असते.” मात्र, तेव्हाही उशीर झाला होता आणि वर्षा व तिच्या अजन्म्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे वर्षाचा संसार उध्वस्त झाला असून, पाच वर्षांची छोटी ‘खुशी’ आईविना राहिली आहे. संतप्त गावकऱ्यांनी नवजीवन हॉस्पिटलसमोर आंदोलन छेडले आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती पाहता संबंधित डॉक्टर आणि आरोग्य सेविकेची सेवा तत्काळ बदलण्यात आली आहे.
दरम्यान, दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दीपक कुठेमाटे यांनी ठामपणे सांगितले आहे की, “माझ्या पत्नीच्या मृत्यूस डॉक्टर साबळे जबाबदार आहेत, आणि आम्ही न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही!”
ही घटना दर्यापूरसह आसपासच्या परिसरात संतापाची लाट उसळवणारी ठरली आहे. नागरिकांतून एकच प्रश्न उपस्थित होत आहे — निष्काळजी उपचार पद्धतीमुळे जर जीव जावे लागणार असेल, तर कोणत्या रुग्णालयावर विश्वास ठेवायचा?