टिकल्या काढल्यामुळे वाचलो; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे? प्रकाश महाजनांचा सवाल

महाराष्ट्र : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. महिलांनी टिकल्या काढल्यामुळे आपले प्राण वाचल्याचे सांगितल्यावरही शरद पवार अजून पुराव्याची मागणी का करतात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार यांनी महिलांना हात लावला गेला नाही, असे विधान करत हल्ल्याचा धार्मिक हेतू नाकारण्याचा प्रयत्न केला. यावर प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, महिलांनीच सांगितले आहे की टिकल्या काढल्यामुळे त्यांना सोडण्यात आले. मग अजून शरद पवारांना कोणत्या पुराव्याची गरज आहे? हिंदू म्हणून मारलं गेलं हे कटू सत्य ते का स्वीकारत नाहीत?, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
महिलांना उदात्त हेतूने सोडले नाही – प्रकाश महाजन
महाजन म्हणाले, “महिलांना उदात्त हेतूने सोडले नाही, तर त्यांनी इतरांना सांगावे म्हणून सोडले.” त्यांनी हिंदूंवरच निशाणा साधल्याचा आरोप करत शरद पवारांवर हिंदूविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. त्यांनी विचारले, “शरद पवार मुस्लिमांचे लांगूलचालन का करतात? ढोंगी पुरोगामीपणा का दाखवतात?”
काश्मिरी लोकांकडून स्थानिक सहकार्याचा आरोप
प्रकाश महाजन यांनी स्थानिक काश्मिरी लोकांवरही टीका केली. त्यांनी सांगितले की, “अतिरेकी स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय आले नसते. स्थानिकांनी आधार दिल्याचे हे कटू सत्य आहे. सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहेच, पण स्थानिकांनीही दहशतवादाला साथ दिली.”
हिंदू म्हणून बलिदान नाकारू नका – महाजनांचा इशारा
महाजनांनी स्पष्टपणे सांगितले की, “दहशतवाद्यांनी हिंदूंना टार्गेट केले होते. अन्यथा चौफेर गोळीबार झाला असता. एका दहशतवादी हल्ल्यात 10 वर्षांच्या मुलाने ‘हिंदू म्हणून मारले’ असे सांगितले, तरीही काही नेते सत्य नाकारत आहेत.”
ठाकरे गटावरही टीका
प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरही निशाणा साधला. “ज्यांच्या वडिलांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्या उद्धव ठाकरेंचा एकही खासदार दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत नव्हता. तरीही ते स्वतःला हिंदूंचे रक्षक म्हणवतात. याची लाज वाटायला पाहिजे,” असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला.