नांदेड : कामठा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डीजे मुक्त जयंती साजरी

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील कामठा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डीजे मुक्त आणि शिस्तबद्ध पद्धतीने विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. सुमारे 12 हजार लोकसंख्येच्या या गावात सुमारे २५ ते २६ जातींचे नागरिक एकोप्याने राहतात. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी एकत्र येत साजरी केलेली ही शिस्तबद्ध आणि डीजे मुक्त जयंती संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातही कौतुकास्पद ठरली आहे.
डीजे वाद्यांची गोंगाटमुक्त आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडलेल्या या जयंतीनंतर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जयंती मंडळ व ग्रामस्थांचे खुलेपणाने कौतुक केले. तसेच अर्धापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर कदम, ए.पी.आय. विष्णुकांत कराळे, आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत कामठा गावच्या सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आणि जयंती मंडळाचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस ठाण्याच्या वतीने साल, पुष्पगुच्छ आणि हार घालून गौरव करण्यात आला.