पथ्रोटमध्ये सर्वधर्मीय एकतेचा निर्धार; दहशतवादाचा निषेध, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
अचलपूर : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अचलपूर तालुक्यातील पथ्रोट गावात सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
या श्रद्धांजली सभेत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार आदी पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी एकत्र येत पाकिस्तानविरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या नाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
सभेमध्ये दहशतवादाच्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. तसेच अशा अमानुष घटनांचा देशभरातून प्रखर निषेध व्हावा आणि देशाची सुरक्षा अधिक बळकट व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.