पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१ पर्यटक सुखरूप परतले
अकोला : २६ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे अकोल्याचे ३१ पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले होते. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्व पर्यटकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले.
काल सर्व पर्यटक मुंबईत सुखरूप पोहोचले होते. आज सकाळी खास स्पेशल बसद्वारे या सर्व पर्यटकांना अकोल्यात आणण्यात आले. अकोल्यात आगमन होताच, भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी सर्व पर्यटकांचे स्वागत केले.
हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात अडकलेल्या अकोल्याच्या नागरिकांना सुखरूप घरी परत आणल्याबद्दल प्रशासनाचे आणि सुरक्षादलांचे कौतुक होत आहे. पर्यटकांनीही त्यांच्या जीविताची काळजी घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.