पुसद शहरात बोगस कागदपत्रांनी जन्म प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न; सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल

पुसद : पुसद शहर पोलीस ठाण्यात तब्बल सात जणांविरुद्ध बोगस कागदपत्रांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार ४९ प्रकरणांची चौकशी करण्यात आली.
चौकशीत तीन व्यक्तींची कागदपत्रे बनावट आढळल्याने तहसीलदार महादेव जोरवर यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, इतर चार व्यक्तींची कागदपत्रेही खोटी आढळली असल्याने त्यांच्या विरोधातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित व्यक्तींनी खोटी टीसी (स्कुल लीव्हिंग सर्टिफिकेट), बनावट बोनाफाईड सर्टिफिकेट, स्थानिक जन्म नोंद नसल्याचा बनावट दाखला आदी कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
गुन्हा दाखल झालेल्या सातही व्यक्ती भारतीय नागरिक असून त्यांनी फसवणूक करून जन्म नोंद प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकारामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले असून यापुढे अशा प्रकारच्या प्रकरणांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.