बडनेरा येथील होली क्रॉस स्कूलमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; मुख्याध्यापिका आणि शिक्षिका रंगेहात अटकेत
बडनेरा : बडनेरा नवी वस्तीमधील अत्यंत नामांकित समजली जाणारी होली क्रॉस हिंदी प्रायमरी स्कूल लाचखोरीच्या प्रकरणामुळे सध्या चर्चेत आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता फ्रान्सिस धनवटे (वय ४२) आणि सहाय्यक शिक्षिका अश्विनी विजय देवतार यांना आज अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले.
१००% शासकीय अनुदानित असलेल्या या शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली केली होती. शाळेकडून प्रत्येक पालकाकडून १५०० रुपये मागितले गेले होते. त्यातील ८०० रुपये आधीच वसूल करण्यात आले होते, तर उर्वरित ७५० रुपयांसाठी दबाव टाकण्यात येत होता.
या अन्यायाविरुद्ध एका धाडसी पालकाने तक्रार नोंदवल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने नियोजनबद्ध सापळा रचत, २५ एप्रिल रोजी या दोन्ही महिला शिक्षकांना लाच स्वीकारताना पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे आणि उपअधीक्षक अभय अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या धक्कादायक घटनेमुळे बडनेरा परिसरातील इतर अनुदानित शाळांमध्येही खळबळ उडाली असून, पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.