बासपाणी गावाची पाणीटंचाई कायम; लाखोंचा खर्च करूनही नागरिक तहानलेलेच
धारणी : धारणीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बासपाणी गावात तीन वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्णच राहिली आहे. लाखो-कोटी रुपयांचा खर्च करून गावात विशाल पाण्याची टाकी उभारण्यात आली असली तरी, अजूनही गावकऱ्यांना एक थेंबही पाणी मिळालेला नाही.
दररोज पाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, गावातील महिलांना लांब अंतर जाऊन पाणी आणावे लागत आहे. पाण्याअभावी शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत.
अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. लाखो रुपये खर्चूनदेखील योजना पूर्णत्वास न पोहोचल्यामुळे सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या परिस्थितीकडे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे आवाज उठवत, न्याय मिळावा यासाठी एकत्रितपणे आंदोलक भूमिका घेतली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि सातत्यपूर्ण पाणीपुरवठा मिळावा, यासाठी शासन आणि प्रशासनाने आता ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक झाले आहे.