महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानींची आकडेवारी समोर; मुंबई, पुणे आणि ठाण्यातील संख्या आश्चर्यजनक!

जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात येतंय. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या करारात अनेक निर्बंध आणले. यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानींना देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच त्यांना 48 तासांचा अल्टीमेटमही देण्यात आला.
महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे. अल्पकालीन व्हिजा म्हणजेच शॉर्ट टर्म व्हिसा असलेले एकूण 55 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार ठाणे शहरात 19, नागपूरमध्ये 18, जळगांवमध्ये 12, पुणे शहरात 3, मुंबईत 1, नवी मुंबईत 1 आणि रायगडमध्ये 1 पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर असल्याचे समोर आलंय.
भारतात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यातून समोर आला, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सार्क व्हिजा, टुरिस्ट व्हिजा घेऊन आलेल्या नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचा आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे . या प्रकारानंतर जिल्हा पोलीस दल सक्रीय झालं असून जळगावमध्ये पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी तसेच चौकशी सुरू करण्यात आली आहे. 327 पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये टुरिस्ट व्हिजा घेऊन राहत असल्याची बाब समोर आली आहे, या संदर्भात शासनाचे कारवाई संदर्भातले जे आदेश येतील त्यानुसार संबंधितांवर कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी ही माहिती दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी जळगावत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार जळगाव शहरात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी सिंधी बांधव राहत असल्याचा समोर आलं होतं. संबंधितांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, मात्र नागरिकत्व स्वीकारल्यानंतरच्या शासनाच्या सरकारच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचा संबंधित व्यक्तींकडून पालन होत नसल्याने धोका निर्माण होऊ शकतो असं गजानन मालपुरे यांनी म्हटलं आहे. राजकीय दबाव असल्यामुळे संबंधितांकडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील गजानन मालपुरे यांनी केला आहे. दरम्यान, संबंधित नियम अटींचं पालन करत नसल्यामुळे भविष्यात अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील गजानन मालपुरे यांनी उपस्थित केला आहे.