जळगावच्या चोपड्यात बापानेच मुलीवर गोळीबार; प्रेम विवाहाचा राग प्राणघातक ठरला!

जळगाव : जळगाव जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच मुलीवर आणि जावयावर गोळीबार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, गोळीबाराच्या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावच्या चोपड्यात ही घटना घडली आहे.
मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपी बापाच्या मनात होता. त्याच रागातून मुलीच्या बापाने तिच्यासह जावयावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती पाठीत गोळी घुसल्याने गंभीर जखमी झाला आहे, त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तृप्ती अविनाश वाघ असे मयत 24 वर्षीय तरुणीचे नाव असून अविनाश ईश्वर वाघ हा गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव असून ते सीआरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीने गोळीबार केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या संतप्त वऱ्हाडींनी किरण मंगले याला चांगलाच चोप दिला. त्यात तो सुद्धा गंभीर जखमी झाल्याने त्याला जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी अविनाश व तृप्ती यांचा प्रेम विवाह झाला होता. तो विवाह पित्याला मंजूर नव्हता. चोपडा शहरात अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम निमित्ताने ते दोघे चोपडा येथे आले होते. मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग किरण अर्जुन मंगले यांच्या डोक्यात होता. तेदेखील चोपडा येथे हळदीच्या ठिकाणी आले. त्यानंतर त्याने मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर व तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. त्यांनी तीन राउंड फायर केले. यात मुलगी तृप्ती जागीच ठार झाली तर जावई अविनाशच्या पाठीतून गोळी पोटात घुसली तर दुसरी गोळी हाताला लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला अत्यवस्थ अवस्थेत जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेतील पिस्तूल जप्त केल आहे.