“पहलगाम हल्ल्याचा मोर्शीत तीव्र निषेध; श्रद्धांजली सभेत देशभक्तीचा निर्धार” मृतकांना वाहिली श्रद्धांजली
मोर्शी : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात निष्पाप देशवासीयांचा बळी गेला. या हल्ल्याचा तीव्र निषेध आणि मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोर्शी शहरातील भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्व सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्र येत श्रद्धांजली सभा आयोजित केली.
कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या देशवासीयांना आदरांजली वाहिली. परिसर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला होता.
यावेळी उपस्थितांनी आतंकवादाचा तीव्र निषेध व्यक्त करत, देशाच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे उभे राहण्याचा आणि आवश्यक ती भूमिका बजावण्याचा निर्धार केला. श्रद्धांजली सभेत देशप्रेमाचे आणि एकात्मतेचे अद्वितीय उदाहरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.