बडनेरा रस्त्यावर भीषण अपघात; बोलेरोच्या धडकेत ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू

अमरावती : अमरावतीहून बडनेराकडे परतत असताना बुलेट दुचाकीस्वार साहिल अशोक माटे (वय २९) आणि संघराज संपत डोंगरे (वय ३२) यांच्या दुचाकीला बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. ही भीषण घटना २२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
धडकेनंतर दोघेही गंभीर जखमी झाले होते. संघराज डोंगरे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी साहिल माटे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बोलेरो चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की संघराज यांच्या डोळ्याला झालेल्या जबर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या एक महिन्यात भरधाव वेगाने वाहन चालवण्यामुळे दोन वेगवेगळ्या प्राणघातक अपघात घडले आहेत. याआधी एका सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता, तर आता या अपघातात ३२ वर्षीय युवकाचा जीव गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बोलेरो पिकअप वाहन आणि पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरू केला आहे.