यवतमाळमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे शेतकरी कर्जमाफीसाठी ट्रॅक्टर मोर्चा

यवतमाळ : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने यवतमाळमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व यवतमाळ-वाशिमचे खासदार संजयभाऊ देशमुख व जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड करणार आहेत.
हा मोर्चा 9 मे रोजी वनवासी मारुती देवस्थान, आर्णी रोड, यवतमाळ येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन समारोप होईल. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
“महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे वचन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हे वचन पाळलेले नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांशी विश्वासघात केला आहे,” असा आरोप खासदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
या मोर्चात वणीचे आमदार संजय देरकर, आमदार सागरताई पुरी, शिवसेनेचे कार्यकर्ते, विविध शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.