यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईसंदर्भात कठोर पावले; दोषींवर वेतनवाढ थांबविण्याची कारवाई – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

यवतमाळ : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येवर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजनांचे नियोजन पूर्वीपासून सुरू असतानाही काही भागांत अजूनही पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे नमूद करत, पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल भवन येथे झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत कठोर निर्देश दिले.
“जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई जाणवणार नाही याची पूर्ण दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी,” असे सांगत त्यांनी टंचाईस जबाबदार आढळणाऱ्यांवर वेतनवाढ थांबविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत ग्रामसेवकांपासून संबंधित अभियंत्यांपर्यंत सर्वांना जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री राठोड यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी ‘पाणीदार गाव योजना’ प्रभावीपणे राबवावी. दरवर्षी उन्हाळ्यात जे गावं पाणीटंचाईला सामोरे जातात, अशा गावांची यादी तयार करून त्याठिकाणी ‘जलसमृद्ध, पाणीदार गाव अभियान’ राबवले जावे. या गावांना कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, आणि त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी आश्वस्त केले.