भांडपुरा परिसरात वाहन पार्किंगवरून वाद; हातात तलवार घेऊन तरुणाचा कहर

अकोला : जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भांडपुरा परिसरात वाहन पार्किंगवरून निर्माण झालेला वाद चिघळून तुफान गोंधळ उडाला. शेजाऱ्यांमध्ये वाद इतका टोकाला गेला की, एका तरुणाने हातात तलवार घेऊन परिसरात थैमान घातले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. रस्त्यावर चालणारे नागरिकही थरथरले.
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच जुने शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि आरसीपी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केवळ पार्किंगच्या वादावर तलवारी चालवली जात असेल, तर भविष्यात अकोल्याची शांतता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.