जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग, शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती : शासनाची महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही योजना शेत जमीन सुपीक करणे आणि धरणातील पाणीसाठा वाढवणे यासाठी उपयुक्त असल्याने शासनस्तरावर जाणीवपूर्वक राबविल्या जात आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तिवसा तालुक्यातील विरगव्हाण आणि दिवाणखेड येथे सुरु असलेल्या कामांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी भेट देऊन पाहणी केली.
या भेटीदरम्यान जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच आणि लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. ही कामे अशासकीय संस्थांमार्फत केली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तलावातील गाळ काढून पाणी साठा वाढवणे आणि त्याचबरोबर अत्यंत सुपीक गाळ शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करणे हा आहे. यामुळे कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.
सध्या जिल्ह्यात एकूण २४४ कामे मंजूर असून त्यामधून सुमारे ४५ लक्ष घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा शेतकरी लाभ घेत असून, स्वतःच्या खर्चाने गाळ वाहून नेण्यासाठी लघु पाटबंधारे विभागामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेऊन आपली शेती सुपीक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले आहे.