मुलगी IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू, यवतमाळची दु:खद घटना

यवतमाळ : युपीएससी परीक्षेत घवघवते यश मिळवणाऱ्या मोहिनी प्रल्हाद खंदारे यांच्या कुटुंबावर आनंदाच्या क्षणीच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोहिनी खंदारे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी निकालात ८४४ वा रँक मिळवून यश संपादन केले. संपूर्ण कुटुंब या यशामुळे आनंदात असतानाच रविवारी सकाळी त्यांच्या वडिलांना, प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे दुःखद निधन झाले.
प्रल्हाद खंदारे हे वाकद (ता. महागाव) येथील रहिवासी होते आणि शिक्षण विस्तार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मोठ्या पदांवर पोहोचवले आहे. मोठा मुलगा विक्रांत खंदारे सध्या जिल्हा न्यायाधीश आहे तर सून देखील न्यायाधीश आहे. लहान मुलगी मोहिनीने आता युपीएससीतून प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला आहे.
मुलीच्या यशाच्या आनंदाने प्रल्हाद खंदारे यांनी गावात बॅनर लावले, पेढे वाटले, सर्वत्र आनंद व्यक्त केला होता. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. महागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातही त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि परिचितांमध्येही शोक व्यक्त केला जात आहे