यवतमाळ: नाकाबंदी दरम्यान गोवंशाची अवैध वाहतूक उघड – दोन आरोपी अटकेत

यवतमाळ : वडकी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत १२ बैलांची अवैध वाहतूक उघडकीस आणण्यात आली आहे. या कारवाईत वाहनासह एकूण २२,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 40 CM 3230 क्रमांकाच्या आयशर वाहनातून गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नाकाबंदी लावण्यात आली होती. तपासणीदरम्यान सदर वाहनातून १२ बैल सापडले असून, या गोवंशाची एकूण किंमत अंदाजे २,४०,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, वापरण्यात आलेल्या आयशर वाहनाची किंमत सुमारे २०,००,००० रुपये आहे.
या प्रकरणी आबिद नूर कुरेशी (वय २६, रा. महेंद्र नगर, नागपूर) आणि जगदीश भीमराव लिंगायत (वय ३७, रा. ओले नगर, कोराडी, नागपूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5, 5 अ, 5 ब आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 मधील कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.