सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आ. रवी राणा यांचा वाढदिवस साजरा
अमरावती : 28 एप्रिल रोजी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. यावर्षी रवी राणा यांच्या संकल्पनेनुसार वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू नागरिकांसाठी विविध मदत उपक्रम आणि सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित या विशेष कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या देशवासीयांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार अनिल बोंडे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून पुढील समाजोपयोगी कार्ये राबवण्यात आली:
महाआरोग्य शिबिरात गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी सुविधा देण्यात आली. तपासणीत डोळे, दात, हृदयविकार, स्त्रीरोग, कर्करोग आणि मॅमोग्राफी यांचा समावेश होता.
रक्तदान करणाऱ्या नागरिकांना १६ जीबी पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ गिफ्ट आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
विधवा महिलांना शिलाई मशीन, बेरोजगार युवकांना चारचाकी लोटगाडी, तसेच मुलांना क्रिकेट बॅट-बॉल किट वितरित करण्यात आले.
- भजन महिला मंडळांना भजन साहित्याचे वितरण करण्यात आले.
- विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम देखील राबवले गेले.
- सर्वधर्मीय नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे, माजी मंत्री सुनील देशमुख, समाजसेवी लप्पीसेट जाजोदिया, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, आणि महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रवी राणा यांच्या या समाजसेवेच्या उपक्रमांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, वाढदिवसाचा हा समाजहिताचा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.