५० पेक्षा अधिक घरफोडी करणारा कुख्यात चोरटा नागपूर पोलिसांच्या ताब्यांत

नागपूर : नागपूर शहरात जानेवारी २०२५ मध्ये सलग तीन दिवस घरफोड्यांचा सत्र सुरू करून भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या नरेश महिलांगे या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. देशपांडे लेआउट आणि सालासर विहार लेआउट परिसरात घडलेल्या तीन घरफोड्या आणि एका घरफोडीच्या प्रयत्नामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
आरोपीने घरात घुसून सोने, चांदीचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून अवघ्या दोन महिन्यांत आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतले.
नंदनवन पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटवर आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. सध्या आरोपीविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात चार घरफोडीचे गुन्हे दाखल असून चोरी गेलेल्या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे आठ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तपासादरम्यान उघड झाले आहे की नरेश महिलांगे याच्यावर भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नागपूर पोलिसांनी या घटनांनंतर परिसरात पेट्रोलिंग वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
पोलिसांकडून आरोपीच्या आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू असून, काही दिवसांत आणखी काही मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.