अकोल्यात ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ सादर – डॉक्टरांचा सांस्कृतिक आयोजन !

महाराष्ट्र दिनानिमित्त अकोल्यात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तर्फे “महाराष्ट्राची गौरवगाथा” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आरोग्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर्सनी या वेळी पारंपरिक नृत्य, संगीत आणि नाट्यमय सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला उजाळा दिला.
IMA अकोल्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुमार सोमानी यांनी पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांच्या सोबत सचिव डॉ. प्रदीप अग्रवाल आणि शहरातील अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात नंदी, भूपाळी, वासुदेव, भारूड, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, लावणी, देवीचा गोंधळ यांसारख्या पारंपरिक कलाप्रकारांचे सादरीकरण डॉक्टरांनी स्वतः साकारले. यामध्ये केवळ मनोरंजन नव्हतं, तर डॉक्टरांचं समाजाशी असलेलं नातं आणि सांस्कृतिक बांधिलकी याचं सुंदर प्रतिबिंब दिसून आलं.
‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ ही संकल्पना IMA अकोल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून उभी केली. नागरिकांसाठी हा कार्यक्रम मोफत प्रवेश असलेला असून, IMA सभागृह आणि कार्यक्रम स्थळी पासेस उपलब्ध करून देण्यात आले होते.
या कार्यक्रमाने अकोल्याच्या सांस्कृतिक नकाशावर एक ठसा उमटवला असून, “डॉक्टर्स केवळ वैद्यकीय सेवा पुरवणारे नसून ते संस्कृतीचे जतन करणारेही असतात” हा सामाजिक संदेश अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.